0मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला वीर शिंगरोबा यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा0

Wednesday, April 8, 2009

माझी उमेदवारी कशासाठी ?

माढा मतदारसंघातून एक तथाकथीत बलाढ्य उमेदवार उभा असताना महादेव जानकर यांचा तिथे टिकाव लागणार का, असे तर्क-वितर्क सामाजिक व राजकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहेत. मुळातच, समोर कोणता उमेदवार उभा आहे, हे पाहण्याची मला गरज वाटत नाही. मतदारसंघांची पुनर्रचना होत असतानाच दीड वर्षांपूर्वी मी माढ्यामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्यामागे विविध कारणे होती. माझे मुळगाव (म्हसवड येथील पळसावडे) याच मतदारसंघात आहे. साता-या जिल्ह्यातील या गावापासून सोलापूर आणि सांगली जिल्हे जवळच आहेत. त्यामुळे सातारा, सोलापूर व सांगली या तिन्ही जिल्ह्यातील भौगोलिक, सामाजिक, सास्कृतिक परिस्थितीची मला चांगली जाण आहे. शेती, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य इत्यादी समस्यांची जाण आहे. साहजिकच नव्याने निर्माण झालेल्या माढा मतदारसंघातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, माण-खटाव, फलटण हा सर्व भाग माझ्या पूर्ण परिचयाचा आहे. किंबहूना मी याच मातीतला आहे. म्हणून पूर्ण विचाराने आणि अभ्यासपूर्वकच या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मी निर्णय घेतला आहे.
खरेतर, अठरा वर्षांपूर्वी मी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडलो. प्रथम श्रेणी आणि सुवर्णपदक मिळाल्याने मला सहजपणे नोकरी मिळण्याची खात्री होती. पण कॉर्पोरेट जगतातील उंची पगार व सुखवस्तु आयुष्य जगण्यात मला स्वारस्य वाटले नाही. मी थेट समाजकार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एका प्रतिष्ठीत सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या महादेव जानकरला नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही याच्या डोक्यात समाजसेवेचे खुळ शिरल्याची टिका-टिप्पणी त्यावेळी माझ्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली. पण अशा टिका-टिप्पणीकडे दुर्लक्ष करून समाजकार्यात झोकून देण्याच्या निर्णयावर मी ठाम राहिलो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक या महापुरूषांनी मांडलेल्या विचारसरणीवर मी माझे कार्य करीत राहिलो. शेतकरी, गोरगरीब जनता, मागासवर्गीय समाज यांच्या समस्या जाणून घेतल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतक उलटून गेले तरी या गोरगरीब समाजापर्यंत स्वातंत्र्याची फळे पोहचली नसल्याचे कटुसत्य जाणवले आणि गलबलून आले. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी गोरगरीब, पिढीत, वंचित, गांजलेल्या जणतेला अद्यापही स्वातंत्र्य मिळाले नसल्याची जाणीव मला होऊ लागली. या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे प्रकर्षाने वाटू लागले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक आंदोलने, चर्चासत्रात सहभागी झालो. गोरगरीब समाजाच्या उपेक्षेला प्रस्थापित राजकारणीच जबाबदार असल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हाच मी ठरवले, जगायचे तर केवळ समाजासाठीच...!
समाजासाठी सर्व स्वार्थ बाजूला ठेवण्याचाही निर्धार मी केला. घराकडे कधी फिरकायचे नाही, लग्न करायचे नाही अशी खुणगाढ बांधूनच गेली अठरा वर्षे मी माझे कार्य सुरू ठेवले आहे. लोकांची सत्ता आणायची असेल, तर जिथे-तिथे आपले मुले, नातलग यांचीच वर्णी लावून चालणार नाही. गोरगरीबांमधील नेतृत्त्व पुढे यायला हवे, ही माझी धारणा आहे. त्यामुळे जे काही मी कमवेन, यश संपादन करेल, त्याच्यावर सर्वसामान्य लोकांचाच हक्क असेल. किंबहूना लोकांची सत्ता आणण्यासाठीच मी राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली आहे. प्रस्थापीत राज्यकर्त्यांनी देशाची सत्ता आपल्या कुटुंबापर्यंतच मर्यादीत ठेवण्याचे कारस्थान रचले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून मी लढवित असलेली निवडणूक तशी मला सोपीच वाटते. कारण माझ्यासमोरचे तथाकथित बलाढ्य उमेदवार हे प्रस्थापीत नेते आहेत. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नेतृत्त्व पुढे आणण्याऐवजी त्यांनी आपलीच मुलगी-पुतण्या व धनदांडग्यांनाच मोठे केले आहे. माढ्यातील गोरगरीब व वंचित जनतेच्या भल्यासाठी या नेत्याने काहीही योगदान दिलेले नाही, त्यामुळेच सर्वसामान्य जनतेमधून या नेत्याविषयी संतापाची भावना आहे. या उलट गेली दीड वर्षे मी या मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढले आहे. मतदारसंघातील जनतेशी माझी भावनिक नाळ जोडलेली आहे. शेतक-याचा मुलगा म्हणून जनतेकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंबहूना जनतेनेच ही निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे आग्रह धरला होता. खरेतर, आर्थिकदृष्ट्या माझी परिस्थिती कमकुवत आहे. तरीही या निवडणुकीसाठी जनता, कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जनतेचा हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन...!

- श्री. महादेव जानकर

Read more...

Friday, April 3, 2009

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा

१. माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत माळशिरस, सांगोला, माढा, माण-खटाव, फलटण व करमाळा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा प्रमुख सत्ताधारी पक्ष असतानाही या पक्षाने मतदारसंघाचा विकास केला नाही. यावरून या पक्षाचा नाकर्तेपणा दिसून येतो.

२. माढा लोकसभा मतदारसंघात अठरापगड जातींची मोठी संख्या आहे. धनगर समाज सात लाख, माळी समाज तीन लाख, गरीब मराठा तीन लाख, दलित सव्वा लाख, मुस्लीम सव्वा लाख, रामोशी ९० हजार अशी येथील गोरगरीब व मागासवर्गीय मतदारांची संख्या आहे. त्यातही शेतक-यांचे प्रमाण ८० टक्के आहे. तरीही प्रस्थापीत घराण्यांतील धनधांडग्या नेत्यांनी इतर समाजातील नेतृत्व पुढे येवू दिले नाही. प्रस्थापीत घराण्यांना मोठे करायचे आणि इतर मागासांना दुबळे बनवायचे कारस्थान राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वर्षानुवर्षे शिजत आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार व सुप्रिया सुळे यांना जाणीवपुर्वक मोठे केले जाते, पण गरीबांमधील कोणालाही मोठे बनविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

३. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण ते केवळ उच्चभ्रुंचे राजा आहेत. दीनदुबळ्या समाजाचा वापर करायचा आणि आपल्याच प्रस्थापित घराण्यांतील लोकांना मोठे बनवायचे कारस्थान पवार यांनी नेहमीच केले आहे. माढा हा त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. दीनदुबळ्यांबद्दल कणव असती तर त्यांनी माढामध्ये (आणि महाराष्ट्रातही) मराठा समाजाबरोबरच इतर पिचलेल्या समाजालाही पुढे नेले असते. उच्चभ्रु मराठ्यांना वरदहस्त देण्याच्या त्यांच्या कारस्थानामुळे पिचलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागावे लागत आहे.

४. माढामधील सर्व भौगोलिक क्षेत्र कमालीचे अविकसित आहे. या मतदारसंघात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शेतीचे भवितव्य फक्त पावसाळ्यावरच अवलंबून असते. सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीचा उगम झाला आहे. पण सातारा जिल्ह्यातीलच माढा मतदारसंघामध्ये नव्याने सामाविष्ट झालेले माण-खटाव व फलटणचा काही भाग सुजलाम सुफलाम होऊ शकलेला नाही. तसेच माढा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यात सामाविष्ट असलेले सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा या भागांचाही विकास झालेला नाही. एवढेच नव्हे तर, या भागात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. या बेरोजगार तरूणांच्या हाती काम देण्यासाठी कारखाने, उद्योग सुरू करून रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राज्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही केलेला नाही.

५. शेतक-यांचे प्रश्न तर आ वासून उभे आहेत. दिवसेंदिवस कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. धनाढ्य शेतक-यांना मदतीचा हात तर गरीब शेतक-याला लाथ अशी दयनीय स्थिती या भागामध्ये आहे. निवडणुकीची धामधुम सुरू असताना माढ्यातील विहिरींमध्ये पाणी नाही, शेतीमध्ये काही पिकत नाही. मात्र, राष्ट्रवादीचे नेते त्यावर एक चकार शब्द न काढता आपले साहेब माढ्यामधून निवडणूक लढवित असल्याचा डांगोरा पिटत आहेत. गेली पाच वर्षे देशाचे कृषीमंत्री म्हणून काम केलेल्या शरद पवार यांनी माढ्यातील शेतक-याची दशा संपविण्यासाठी काहीच केले नाही. श्रीमान शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री व त्यापूर्वी मंत्री असतानाही त्यांनी या मतदार संघासाठी काहीही केलेले नाही. माढ्यातील वर्षानुवर्षे नागवलेल्या शेतक-यांचा विकास करण्याचे त्यांना आतापर्यंत का सुचले नाही, याचे उत्तर पवार व त्यांच्या अनुयायांनी देण्याचे धाडस करावे. शेतकरी आत्महत्या करीत असताना प्रस्थापीत नेते मात्र क्रिकेट मॅचेसमध्ये गुंग आहेत.

६. माढा लोकसभा मतदारसंघातील विविध भागातील गरीब व पिचलेल्या समाजाची उन्नती न करता केवळ प्रस्थापित घराण्यांनाच मोठे करण्याचे कारस्थान राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे. त्यामुळे मतदारबंधू व भगिनींनो शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना आपले अमूल्य देऊ नका, असे आम्ही आपणास आवाहन करतो.

७. गेल्या काही दिवसांपासून पवार यांच्याबद्दल वृत्तपत्रात काम न करणारे कृषीमंत्री असल्याचे छापून येत आहे. ते विश्वासू नाहीत, असेही वृत्तपत्रांमध्ये म्हटले जाते. त्यामुळे मतदारांनी पवार यांना मत देण्याची चूक करू नये.

८. मतदार बंधू आणि भगिनींनो महादेव जानकर यांच्या रूपाने तुमच्या-आमच्यातील तरूण व हुशार व्यक्ती शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहे. समाजाचे कल्याण करण्यासाठी जानकर यांनी १८ वर्षांपूर्वी आपले घर सोडून दिले. त्यांनी लग्न करणार नाही, असा निर्णय घेतलेला आहे. जानकर यांनी दीनदुबळया व मागासलेल्या समाजाचे प्रश्न घेऊन मोठी आंदोलने केली. गेल्या दीड वर्षांत त्यांनी माढा मतदारसंघातील सर्व ८२६ गावांना भेटी देवून तेथील समस्या समजावून घेतल्या आहेत. माढाचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. आपण फक्त त्यांच्या हातात सत्ता द्यायला हवी. समाजाच्या कल्याणासाठी स्वत:चे आयुष्य वेचणा-या जानकर यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे.
आम्ही देतो दुस-या स्वातंत्र्याची हाक;
महादेव जानकर यांनाच द्या साथ !

कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून महादेव जानकर यांना भरघोस मतांनी विजयी करा.

Read more...

About This Blog

Lorem Ipsum

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP